Friday, January 3, 2025

माळेतील मोती ओघळु लागले #प्रासंगिक लिखाण ✏️


⏳"माळेतील मोती बिखरु लागले. "  ⌛        

काल रात्री अचानक एक वाईट बातमी कानावर पडली 
आपले रविंद्र भागवत साहेब गेले .क्षणभर काहिच बोध होईना .एक सुस्वभावी ,प्रामाणिक ,कार्य तत्पर एसटी आधिकारी आपल्यातुन गेले हे मन मानायला तयार होईना .आम्ही  सोलापूर, रत्नागिरी ,पुणे ,दापोडी येथे एकत्र काम केलेले होते .अतिशय शिस्तबद्ध व हुषार आधिकारी म्हणून ते परिचित होते .
 आपल्या ग्रुप चा एक सुंदर हार गुंफला गेला आहे. साधारण रा. प. च्या नोकरीमध्ये १९५५ पासुन रुजु झालेल्या आधिकारी /कर्मचारी यांचा हा भव्य दिव्य संघ फारच छान जडला, घडला आहे. संस्थापक मंडळाचे अविरत परिश्रमाचा हा परिपाक आहे. अनेक खात्यातांतील, विभागातील, कनिष्ठ वरिष्ठ आधिकारी या समुहांत सहभागी आहेत. वर्षातुन एक छानपैकी स्नेहसंमेलन घडवुन संचालक मंडळ या सर्वाना एकत्र जमवून "आनंदाचे डोही आनंद तरंग" असे सदैव मनांत घर करुन बसवणारे सोहळे साजरे केले जातात. येथे ना कोणी वरिष्ठ कोणी कनिष्ठ, ना वहातुक शाखेचा ना कोणी अभियांत्रिक शाखेचा, लेखा चा,ना कामगार शाखेचा. येथे सारा सारा "मी पणा" विसरुन एकमेकांना भेटतात, सुख दुखः वाटतात. गहिवरतांत, अप्रतिमच असते ते सारे. साकोसांत तर हे सोहळे वारंवार आयोजित केले जातांत. नविन येणाऱ्या सभासदांना ही अत्यंत अगत्याने सामावले जाते. हे चालले असतांनाच अचानक ग्रुप वर पोस्ट येते... धक्का बसतो... आपल्यांतील एखादा देवाला प्रिय झालेला असतो. डोळे पाणावतांत.मन भुतकाळांत जाते. त्या सहकार्याबरोबरचे काम केल्या चे आठवते.कुठे कुठे एकत्र आलो ते आठवते.घटणांचे पडसाद उमटतात. सुखदायक, दुखःद प्रसंगांची मालिका नजरेसमोरुन जाते. या अलिकडच्या काळांत आपले अनेक सहकारी आपल्याला सोडून गेली.... ही जगरहाटी आहे हे होणारच जो आला तो जाणारच हे सत्य नाकारता येत नाही तरिही आपण दुःखी होतोच ना. आपलाही नंबर येणार आहेच हे माहीत असुनही आपण श्र्वास चालू आहेत तो पर्यंत जगतोय ना. आनंदात, दुखाःत, मित्रासोबत.. पण मित्रांविना नाही जगु शकत. यांत दुमत नसावे.                      
वाईट वाटते ते याचे की ही "मोत्यांची माळ, ओघळू लागली आहे. एक एक मोती ओघळत आहेत माळेतील मोती विखरत आहेत. न सापडण्या साठी. नाहिये होत आहेत...... मन सुन्न व्हायला लागले आहे. प्राक्तन असते ना..... व्यापुन राहिला आहे एक पोकळपणा.       देवा हे सहन करण्याची शक्ती सर्वांना लाभो....  
 
भागवत साहेबांच्या मागे त्यांचे चिरंजीव हेमंत हे आहेत त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांना हे दुखः सहन करण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देओ .भावपूर्ण श्रद्धांजली ॐ शांती ॐ शांती ॐ शांती ॐ .

भास्कर पवार 

     भास्कर पवार

No comments: